मुंबई : नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने मुंबई कडक निर्बंधांच्या दिशेने जात आहे. मुख्यमंत्री नागरिकांचा जीव वाचवण्याचा निर्णय घेत असतील तर त्याला राजकीय आखाडा बनवू नका असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांना खडसावले आहे. केंद्र सरकारकडून फार काही मोठी मदत मिळत नाही. तरीही प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काम करत आहोत असे महापौरांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला आहे. वर्षभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत आढळून येत आहेत. कालच रुग्णसंख्या ८ हजारांवर गेली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आल्याने काळजी वाढली आहे. आयुक्त आणि राज्य सरकार कायम चर्चा करत आहे. राजकारण आपण कधीही करत राहू. पण ज्या जनतेच्या जीवावर आपण निवडून येतो त्यांच्या हिताचे बघितले पाहिजे. काही राजकीय नेते मास्क घालत नसतील तर त्यांनी तसे करू नये असे पेडणेकर म्हणाल्या. मुख्यमंत्री सर्व गोष्टींचा आढावा घेऊन जो निर्णय घेतील तो योग्यच असेल. मंदिरं बंद केलेली आम्ही सहन करणार नाही असं भाजपवाले बोलत असतील तर तुमचं आम्ही ऐकणार. मात्र तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरून काम करता का असा सवाल महापौरांनी उपस्थित केला. जे नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा महापौरांनी दिला. मुंबईकर किंवा राज्यातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी मुख्यमंत्री निर्बंध लावत असतील तर त्याचा राजकीय आखाडा करू नसे असे महापौरांनी विरोधकांना खडसावले आहे.
आरोग्य यंत्रणेवर बोजा
नियमांचे पालन करा असे आवाहन मार्चपासून करतोय. बरेच मुंबईकर नियमांचं पालन करत असले तरी काही लोक नियम पाळत नाहीत. यामुळे कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ होत असल्याचे महापौर म्हणाल्या. नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत, ते त्रासदायक ठरत आहे. आरोग्य यंत्रणेवर जो बोजा येतो तो कमी करण्याची गरज असल्याचे महापौर म्हणाल्या.
कोरोनावर मात करू शकतो
या संकटामध्ये जगातले प्रगत देश देखील खचून गेले आहेत. मुंबई महापालिका अतिशय जोमाने काम करत आहे. लोकांनी मनात आणलं तर कोरोनावर आपण मात करू शकतो. आमची पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. लोकांनी काळजी घेतली पाहिजे असे महापौर म्हणाल्या.
हमीपत्र द्यावे लागणार
अनेक लोकांना कोरोना झाला तरी ते घरीच राहत आहेत. वेळेवर उपचार घेत नाहीत. यामुळे त्यांच्या घरचेही लोक बाधित होत आहेत. यामुळे नागरिकांनी वेळीच उपचार करून घ्यावेत असे आवाहन महापौरांनी केले. होम क्वारंटाईनमध्ये असलेले रुग्ण आणि संशयित रुग्ण नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या रुग्णांना आता हमीपत्र द्यावं लागणार आहे असे त्या म्हणाल्या.
बेस्ट बसबाबत उद्या बैठक
बेस्ट बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. बसमधील प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. बसमधील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त केले जातील. याबाबत बैठक होणार असल्याचे महापौर म्हणाल्या.