मुंबई- सण उत्सव साजरे करताना जनतेने सतर्कता ठेवावी. कोरोना संपलेला नाही. ऑक्सिजनचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे कोविड संबंधी नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आगामी काळात येणारे सण आणि उत्सव पाहता कोरोनाशी संबंधीत नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी, निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही. याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) केले.
राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलिकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये असे आवाहान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
हेही वाचा : हुश्श... मुंबईंत गेल्या दीड वर्षातील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद