मुंबई - राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी प्रभादेवीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या मांसाहारींना एक किलो कोंबडी, तर शाकाहारी व्यक्तींना पनीर देण्यात येईल, अशी ऑफर सरवणकर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन -
कोरोना विरोधाच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी शासनस्तरावर सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतू राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ रक्ताच्या युनिट, प्लेटलेटच्या २ हजार ५८३ युनिट, मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे, अस आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. 13 डिसेंबर रोजी माहीम-वरळी विधानसभा क्षेत्रात न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदानात हे शिबिर होईल. या शिबिरात जे रक्तदाते सहभागी होऊन रक्तदान करतील त्यांना मांसाहरी असल्यास एक किलो चिकन आणि शाकाहारी असल्यास एक किलो पनिर दिले जाणार आहे. अशी जाहिरात सरवकर यांनी केली आहे. या जाहिरातीची सगळीकडे चर्चा होत आहे.