मुंबई - कोरोना व्हायरसने मुंबईमध्ये सध्या थैमान घातले आहे. मागील दीड ते दोन महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे जनजीवन आणि व्यवहार ठप्प झाले आहेत, सर्वांच्याच जीवनात अडचणीत आल्या आहेत. सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. यामध्ये या लॉकडाऊनचा मुंबईमध्ये घर काम करणाऱ्या महिला वर्गाला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. हातात पैसे नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यांच्या या हालखीच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे, ईटीव्ही भारतने ..
संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे २ कोटीच्या वर घर काम करणाऱ्या महिला कामगार आहेत. परंतु यामध्ये नोंदणी असलेले महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. कोरोनाच्या या वातावरणामध्ये बहुतेक घरेलू कामगारांना कामावर घेतले जात नाही. तर तर काहीजण कामावर सुद्धा जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे आणि अशामुळे त्या बहुसंख्य घरेलू कामगारांना पगार सुद्धा मिळू शकला नाही. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते आहे. या संदर्भात मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांकडे घर कामगार महिलांच्या युनियनने मदतीसाठी निवेदनही सादर केले. परंतु त्यावर कोणतीह कार्यवाही झालेली नाही. मात्र दिवसेंदिवस या महिला कामगारांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न बिकट होत चालला आहे.
आम्ही जगायच कसे..? माणुसकीचे दर्शन घडवा घरकाम करणाऱ्या या महिलांच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करून प्रत्येक व्यक्तीने माणुसकी दाखवयला हवी अशी मागणी आता काही सामाजिक संघटना व समाजसेवाकांमधून पुढे येत आहे. या संदर्भात बोलताना समाजसेवक आणि अॅडव्होकेट संतोष सांजकर म्हणाले, की जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे. तो पर्यंत अशा उपेक्षित कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी कुठल्या कायद्याची व निवेदनाची सुद्धा गरज भासणार नाही.
संपूर्ण मुंबईमध्ये घराघरामध्ये काम करणाऱ्या मोलकरीण हे त्या घराचा एक विशिष्ठ व महत्वाचा भागच असतात. त्या विशिष्ट भागाला त्या घर काम करणाऱ्या महिलेला या कोरोना व्हायरस जीवघेण्या वातावरणात एकटे सोडून देणे हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे असे घरेलू कामगार सांगत आहेत आम्हाला मदत करा असे आव्हान महिला करत आहेत.ज्यांच्या घरात कुठली ना कुठली मोलकरीण काम करत असते तिला या वातावरणात सहकार्य करणे खूप गरजेचं आहे. मग ते आर्थिक सहकार्य असेल व इतर दुसऱ्या माध्यमातून केलेले सहकार्य असेल. त्याची नितांत गरज सध्या आहे कारण सध्या लॉक डॉऊनमुळे खाण्यापिण्याचे तसे राहण्याची त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सर्व घर काम कामगार महिलांना जगावे की मरावे असा पेच समोर असल्याची व्यथा घरकाम करणाऱ्या चेंबूर येथील कौसाबाई जगताप आणि ज्योती बाबू काईपरमल यांनी सांगितली.
बहुतेक घरकाम करणाऱ्या महिला या झोपडपट्टीत राहतात आणि झोपडपट्ट्यामध्ये हा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरू लागला आहे. त्या महिलांसमोर आज दोन लढाया उभ्या आहेत, एक तर हाताला काम नसतानाही घर चालवणे व दुसरे म्हणजे झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असलेल्या कोरोना पासून आपले कुटुंब वाचवणे. त्यामुळे ज्या लोकांची धुणी भांडी करण्यामध्ये जिचे संपूर्ण आयुष्य गेले. ज्यांचा स्वयंपाक करण्यामध्ये तिने संपूर्ण वेळ घालवला, ज्यांचा लहान- मुला बाळांचा सांभाळ करण्यासाठी स्वत:हाच्या मुलांना दूर ठेवले त्या घरेलू महिलेला आता आपल्या मदतीची अपेक्षा आहे. ती मदत त्यांना मिळावी, अशी मागणी सर्व घरेलु कामगार महिला करत आहेत.
घरेलू कामगार महिलां आहेत त्यांना स्वताहून फोन करून व परस्पर संपर्क करून आर्थिक व इतर मदत करावी जेणेकरून माणुसकीचे मोठे दर्शन या कोरोना व्हायरसच्या वातावरणामध्ये दिसेल. प्रत्येक समस्यांचे समाधान हे सरकारने मदत करावी व कायद्याने न्याय मिळेल यात नसते. बहुतेक समस्येचे निवारण हे आपल्या माणुसकीमध्ये सुद्धा असते असं घरकाम करणाऱ्या महिलांसाठी लढणाऱ्या अॅड. संतोष सांजकर यांनी म्हटले आहे.