मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यात वेगवेगळ्या शहरांत महिलांवरील घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. मात्र, या संदर्भात राज्य महिला आयोगाकडे प्रत्यक्ष येऊन तक्रारी देण्याचे प्रमाण संचारबंदीमुळे कमी झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान,राज्य महिला आयोगाकडे घरगुती हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी मुंबईतून नोंदवण्यात आल्या आहेत.
महिला आयोगाकडे घरगुती हिंसाचाराच्या मुंबईतून सर्वाधिक तक्रारी
लॉकडाऊनच्या काळात राज्य महिला आयोगाकडे आतापर्यंत राज्यभरातून एकूण ४२४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद विभागातून ३८, अमरावती विभागातून २५, नाशिक ३९ , पुणे विभागातून ६६ , कोकण विभागातून ६९, नागपूर विभागातून २१ तर मुंबईतून ११६ घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तसेच राज्य महिला आयोगाकडे ५० तक्रारी ईमेलद्वारे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये जिल्हा किंवा विभागाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
लॉकडाऊनच्या काळात राज्यात वेगवेगळ्या शहरांत महिलांवरील घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा यांनी सांगितल्यानुसार सध्या संचारबंदी लागू असल्याने महिलांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. याआधी आयोगाकडे दिवसाला ७० तक्रारी येत होत्या. यामध्ये ई मेल, पोस्ट, किंवा प्रत्यक्ष येऊन तक्रार नोंदणी होत होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत पीडित महिलांना घराबाहेर पडणे अवघड झाल्याने पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन तक्रारी देण्याचे प्रमाण घटले आहे. राज्य महिला आयोगाकडून घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १-१८००-२१-०९८० सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत सुरू करण्यात आला आहे.
याचसोबत मोबाइल अॅपच्या माध्यमातून देखील पीडित महिला तक्रार नोंदवू शकतात. महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराचा न्याय निवाडा करण्यासाठी सध्या राज्य महिला आयोग, पोलीस व काही एनजीओच्या मदतीने काम करत आहेत.
लॉकडाऊन काळात मुंबईत महिला व अल्पवयीन मुलींवरील गुन्हे वाढले
लॉकडाऊन काळात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत जून महिन्यात महिलांवरील बलात्काराचे २१ गुन्हे घडले असून अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे २५ गुन्हे समोर आले आहेत. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ४५ गुन्हे घडले आहेत. तसेच विनयभंग, हुंडाबळी व महिलांवरील शारीरिक अत्याचार असे एकूण २३४ गुन्हे समोर आले आहेत. या २३४ गुन्ह्यांपैकी तब्बल ११६ प्रकरणांचा छडा पोलिसांनी लावला आहे.