मुंबई - मुंबईसह राज्यात कॊरोनाचा कहर सुरू असून या संकटाशी जीवाची पर्वा न करता फ्रंटलाइनवर राहत कोरोशी दोन हात करत आहेत ते राज्यभरातील निवासी डॉक्टर. मात्र, याच निवासी डॉक्टरांकडे राज्य सरकारचे किती दुर्लक्ष आहे हे आता समोर आले आहे. मिरज, औरंगाबाद, नांदेड आंबेजोगाई आणि लातूर मधील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मागील दोन महिन्यापासून पगारच मिळालेला नाही. यासाठी पाठपुरावा करूनही पदरी निराशाच पडत असल्याने आता येथील निवासी डॉक्टर आक्रमक झाले आहेत. त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत पगार न मिळाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यात कॊरोनाची परिस्थिती गंभीर असताना असे आंदोलन झाले तर आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. मार्चपासून शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरच रुग्णसेवेत मुख्य भूमिका बजावत आहेत. त्यामुळेच मुंबईतील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन (स्टायपेंड)सह 10 हजार रुपये अतिरिक्त देण्यात येत आहेत. मात्र, मराठवाडा वा इतर शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना 54 हजार स्टायपेंडच मिळतो.
त्यात गेल्या दोन महिन्यांत औरंगाबाद, मिरज, लातूर, नांदेड आणि अंबेजोगाईत रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे आजच्या घडीला निवासी डॉक्टर आरोग्य यंत्रणेचा कणा आहे. पण याच निवासी डॉक्टरांना दोन महिन्यापासून पगाराविना राहावे लागत आहे. या डॉक्टरांना जून-जुलैचा पगार मिळालेला नाही. आम्हाला मुंबईप्रमाणे अतिरिक्त रक्कम मिळत नाहीच. पण त्याचवेळी आहे तो स्टायपेंडही मिळत नाही. जून-जुलैचा पगार आम्हाला अजून मिळलेला नाही. आज सर्वजण आर्थिक अडचणीत असताना पगार मिळत नसेल तर आर्थिक अडचणीत आणखी वाढ होत आहे. तर यासाठी पाठपुरावा करून ही काही होत नसल्याने निवासी डॉक्टर नाराज आहेत. त्यामुळे आता 15 ऑगस्ट पर्यंत पगार न मिळाल्यास त्या दिवसापासूनच आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत अशी माहिती नांदेड मार्डचे अध्यक्ष डॉ. अमित अवचट यांनी दिली आहे.
कोविडच्या संकटात रुग्णांना वेठीस धरणे अजिबात योग्य नाही. पण पगार मिळत नसेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे म्हणत 15 पासून काम बंद करू असा इशारा डॉ. अमीर तडवी, औरंगाबाद, मार्ड यांनी दिला आहे. दरम्यान नॉन कोविड रुग्णांसाठीचे काम काही ठिकाणी थांबवले जाण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी कोविड-नॉन कोविडचे काम बंद होणार आहे. त्यामुळे कोविड संकटात आरोग्य सेवा कोलमडू नये यासाठी याकडे त्वरित लक्ष द्यायची गरज आहे. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचनालयाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांच्याशी याप्रश्नी चर्चा सुरू असल्याची माहिती सेंट्रल मार्डकडून देण्यात आली आहे.