मुंबई -डॉक्टर्स मैदानात उतरल्याने कोविड मुकाबल्यासाठी बळ वाढले आहे. मात्र पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टर्सनी वेळीच कोविड लक्षणे ओळखून उपचार सुरू करावेत, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
'पावसाळ्यात संसर्ग वाढण्याचा धोका, डॉक्टर्सनी वेळीच कोविड लक्षणे ओळखून उपचार सुरू करावेत' - उद्धव ठाकरे कोरोना लसीकरण
कोविडच्या लढाईत आता डॉक्टर्स देखील मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरले आहेत, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रथम त्यांचे आभारही मानले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही आपले विचार मांडले.
'रुग्णांवर व्यवस्थित उपचार होताहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे'
पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची काही लक्षणे आणि कोविडची लक्षणे एकसारखी असतात. त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखावीत तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होताहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल)ने आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते. कोविडच्या लढाईत आता डॉक्टर्स देखील मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरले आहेत, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रथम त्यांचे आभारही मानले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही आपले विचार मांडले.
डॉक्टर्स, जनरल फिजिशियन, विविध रोग तज्ज्ञ, मैदानात
गेल्या वर्षी खासगी डॉक्टर्समध्ये देखील कोविड संसर्गाची मोठ्या प्रमाणवर भीती होती, त्यांनी आपले दवाखाने, रुग्णालये बंद ठेवली होती कारण आपल्याकडे मास्क, पीपीई कीट तसेच इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा देखील मोठ्या प्रमाणवर तुटवडा होता. परंतु आता या दुसऱ्या लाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स, जनरल फिजिशियन, विविध रोग तज्ज्ञ, मैदानात उतरले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“माझा डॉक्टर” म्हणून आपल्यावर रुग्णांचा विश्वास
“माझा डॉक्टर” या संकल्पनेतून सातत्याने राज्यभरातील डॉक्टर्सशी संवाद साधला जातोय. सर्वसामान्य रुग्ण पहिल्यांदा त्याला कोणताही त्रास झाला की आपल्या फॅमिली डॉक्टरकडे तपासणीसाठी जातो, हे लक्षात घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. कोविडची लक्षणे फसवी आहेत. बहुतांश जणांना लक्षणेही दिसत नाही अशा वेळी तुमच्यावर योग्य रीतीने अशा रुग्णास ओळखण्याची जबाबदारी आहे. विशेषत: प्राथमिक आणि मध्यम अवस्थेतील आणि ज्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, असा रुग्ण घरीच व्यवस्थित उपचार घेत आहे किंवा नाही ते आपण पहिले पाहिजे. त्याला कधी रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे. त्याकडेही डॉक्टर्सनी काळजीपूर्वक पाहिले पाहिजे, अश्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
'रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये'
पूर्वीचा संसर्ग आणि सध्याचा संसर्ग यात फरक आहे. आत्ताचा संसर्ग हा म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे पसरत असून त्याचा वेग खूप जास्त आहे. शिवाय रुग्णांवरही जास्त कला उपचार करावे लागत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. म्यूकरमायकोसिस वेगाने पसरतो आहे याचाही त्यांनी संदर्भ दिला.
लहान मुलांमधील कोविड
दुसऱ्या लाटेत तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात संसर्ग दिसतोय तर तिसऱ्या लाटेत बालके संसर्गग्रस्त होऊ शकतात असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यादृष्टीने अधिक सावधानता बाळगली पाहिजे असेही सांगितले.
लसीकरण नोंदी अद्ययावत ठेवा
कोविडसंदर्भात लक्षणांत बदल, दिल्या जाणाऱ्या लसी, लस घेणाऱ्यास असलेल्या सहव्याधी, शरीरात तयार होणारी प्रतीरोधक शक्ती याविषयी व्यवस्थित नोंद होणे गरजेचे आहे. राज्य सरकार प्रथमपासून आकडेवारीत कोणतीही लपवाछपवी करीत नाही. त्यामुळे लसीकरणविषयक वरीलप्रमाणे सर्व नोंदी अद्ययावतपणे करीत गेल्यास पुढे चालून अचूक विश्लेषण करणे शक्य होईल व त्याचा फायदा भविष्यात होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.