मुंबई - कोविड 19च्या युद्धात डॉक्टर, परिचारिका, पॅरा मेडिकल कर्मचारी देवदूत बनून कोविडबाधितांच्या सेवेत आपलं कर्तव्य बजावून मोलाची कामगिरी बजावत आहेत. अशावेळी काही सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने जोगेश्वरीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (ट्रामा केअर) रुग्णालयात प्रेरणा व तणावमुक्त सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी येथील डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी यांनी कोविड योद्धा म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याची शपथ घेतली.
ट्रामा केअर रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतली कोव्हिड योद्धे म्हणून लढण्याची शपथ - कोव्हिड योद्धे म्हणून लढण्याची शपथ
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जोगेश्वरीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (ट्रामा केअर) रुग्णालयात प्रेरणा व तणावमुक्त सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी येथील डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी यांनी कोविड योद्धा म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याची शपथ घेतली.
पश्चिम उपनगरातील जोगेश्वरीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (ट्रामा केअर) रुग्णालयदेखील कोरोनाच्या या युद्धात आपली मोलाची भूमिका बजावत आहे. या दरम्यान येथील 3 परिचारिका व 3 कामगार कोविड पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे येथील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता व नैराश्याची भावना निर्माण झाली होती. यामुळे पालिकेने येथील कर्मचारी वर्गासाठी तणावमुक्त व प्रेरणादायी सत्र आयोजित केले. यासाठी विशेष अधिकारी सुभाष दळवी यांना पाठविले आणि त्यांनी समूह ग्रुप चर्चा, तणावमुक्ती, प्रेरणा, सकारात्मकता या बाबत मार्गदर्शन केले. या सत्रात डॉक्टर, परिचारिका, पॅरा मेडिकल कर्मचारी यांनी या कोरोनाच्या लढ्यात कोविड योध्दा म्हणून काम करत मुंबईला वाचवण्याची शपथ घेतल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिक्षक विद्या माने यांनी दिली.