मुंबई - महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेक ठिकाणी खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद केले. बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांनी सेवा खंडित केली. मात्र, विविध ठिकाणी एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षाला असणारे डॉक्टर विद्यार्थी मदतीला धावले. तसेच अद्याप अनेक डॉक्टर्स अद्याप युद्धभूमीवर कर्तव्य पार पाडत आहेत. आज 'डॉक्टर्स-डे' च्या निमित्ताने डॉ. वेदकुमार घंटाजी या तरुण डॉक्टरचा अनुभव ईटीव्ही भारत प्रकाशित करत आहे.
डॉक्टर होण्याचं लहानपनापासूचं स्वप्न पूर्ण झालं. एमबीबीएस झालो, आता इंटर्नशिप करत खऱ्या अर्थाने डॉक्टर म्हणून काम करणार होतो. त्यामुळे खूप उत्साहीत होतो. 1 मार्चला इंटर्न म्हणून जॉईन झालो; आणि दुसऱ्याच दिवशी हातात पत्र पडलं एअरपोर्टवर कोरोना स्क्रिनिंगच्या कामासाठी जायचं. नायर रुग्णालयाच्या आमच्या इंटर्नच्या टीमला हे काम दिलं. सगळे 23-24 वर्षाचे नवखे मुलं. घाबरून काही जणांनी पळ काढला. पण आपण डॉक्टर आहोत, आपणच घबरलो तर रुगसेवेचे काम कोण करणार असे म्हणत याकडे एक संधी म्हणून पहिलं, आणि काम करत राहिलो. अगदी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही न घाबरता कोरोनावर मात करत आजच डॉक्टर्स-डे च्या दिवशी पुन्हा कामावर रुजू होतोय. हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे, असे डॉ.वेदकुमार घंटाजी म्हणतात.
मूळचा बीडचा असलेल्या वेदने सातवीपासूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि कष्ट-मेहनत करत ते पूर्ण केलं. त्याला एमबीबीएससाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात प्रवेश मिळाला आणि पाच वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करत तो डॉक्टर झाला. पण आता खऱ्या अर्थाने तो डॉक्टर म्हणून काम करणार होता. एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप करावी लागते. तेव्हा हाच काळ असतो तो डॉक्टर म्हणून शिकण्याचा आणि घडण्याचा. त्यानुसार डॉ.वेद आणि त्यासारखे अनेक इंटर्न या नव्या इनिंगसाठी तयार झाले. या वर्षभरात त्यांना खूप काही शिकायचं होत. मात्र कोरोनामुळे डॉ.वेद आणि त्याच्या बॅचची मुलं कोरोनाच्या काळातच इंटर्न म्हणून जॉईन झाले आणि मग कोरोना योद्धा म्हणून काम करू लागले.