मुंबई - एकदा कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होणार नाही असा काहींचा समज आहे. मात्र, मुंबईत असा एक प्रकार घडला आहे जे वाचून धक्काच बसेल. मुंबईतील एका डॉक्टरला कोरोनाचा तीन वेळा संसर्ग झाला आहे. धक्कादायक म्हणजे, दोनदा झालेला संसर्ग हा कोरोनाची लस घेतल्यानंतरही झाला आहे. डॉ. सृष्टी हलारी असे या डॉक्टरचे नाव असून, त्या 26 वर्षाच्या आहेत.
डॉ. सृष्टी हलारी यांना वर्षभरात म्हणजे जून 2020 पासून आतापर्यंत तीन वेळा कोरोनाचे निदान झाले आहे. डॉ. हलारी यांना 17 जून 2020 रोजी कोरोनाची पहिल्यांदा लागण झाली. त्यानंतर 29 मे आणि 11 जुलैलाही त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली. तिन्ही वेळेला आपल्यात सौम्य लक्षणं होती, असे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -बसवराज बोम्माई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड
तीन वेळा कोरोना होण्यामागे विविध कारणं -
या डॉक्टरला जेव्हा पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला तेव्हा त्या मुलुंड जम्बो कोविड सेंटर येथे कार्यरत होत्या. त्यांनी कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि पुढील परीक्षेची त्या तयारी करत होत्या. त्यांना तीनदा कोरोना कसा झाला? याबाबत माहिती मिळालेली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यामागे कोरोनाचा व्हेरिएंट, रोगप्रतिकारक शक्ती किंवा कोरोना चाचणीचा चुकीचा रिपोर्ट अशी बरीच कारणे असू शकतात, असे डॉ. हलारी यांच्यावर उपचार करणारे डॉ. मेहुल ठक्कर यांनी सांगितले.
लसीनंतर दोनदा कोरोना झाला कसा?
लसीकरणानंतरही डॉ. श्रुती हलारी यांना कोरोनाचा नक्की कसा संसर्ग झाला याची तपासणी करण्यासाठी त्यांचे नवीन नमुने घेण्यात आले आहेत. त्यातील एकावर बीएमसी आणि दुसऱ्यावर खासगी हॉस्पिटल फाऊंडेशन फॉर मेडिकल रिसर्च (एफएमआर) या ठिकाणी संसर्गाची कारणे शोधण्यासाठी अभ्यास चालू आहे.
हेही वाचा -55 वर्ष आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुखांची प्रकृती खालावली