मुंबई - आर्थर रोड तुरुंगामधील कोरोनाबाधित ७७ कैद्यांना माहुलमध्ये आणण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. यासाठी आज पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले.
कैद्यांना माहुलमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. माहुल हे आधीच राहण्यास अयोग्य आहे. त्यात कोरोनाबाधित रुग्णांना श्वसनाचा त्रास आहे. त्यांना माहुलमध्ये स्थलांतरित केल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे स्थानिक नागरिकांसह सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे.
या ७७ कैद्यांना माहुल येथे विलगीकरण करून उपचार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. माहुलमधील वातावरण राहण्यायोग्य नसल्याचा अहवाल आयआयटीने दिला आहे. न्यायालयानेही हे मान्य केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना आधीच श्वसनाचा त्रास होत असताना अशा प्रदूषित परिसरात त्यांना का पाठवण्यात येत आहे, असा प्रश्न स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांनी उपस्थित केला. यासाठी शनिवारी माहुलमध्ये जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आले.
मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेली लाखापेक्षा अधिक घरे रिकामी आहेत. त्यामुळे या कैद्यांना तिकडे स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. आर्थर रोडमधील कैद्यांना माहुलमध्ये आणण्यात येऊ नये, यासाठी शनिवारी माहुलवासीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यासमोर जोरदार आंदोलन केले.