मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Mumbai municipal health department) मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. मात्र आरोग्य विभागाकडून आरोग्य सेविकांना वाटप करण्यास देण्यात आलेल्या गोळ्या ह्या हलक्या दर्जाच्या (substandard tablets) असल्याचे समोर आले आहे. यानंतर आरोग्य सेविकांनी या गोळ्यांचे वाटप बंद केले आहे. ज्या मुलांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे त्यांनी या गोळ्या खाल्यास त्यांच्यावर वाईट परिणाम होण्याची भीती आहे.
गोळ्या वाटप थांबवले: मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मुंबईमध्ये विविध मोहिमा चालवल्या जातात. नुकतीच कुष्ठरोग आणि टीबी शोध मोहीम झाल्या नंतर पालिकेच्या आरोग्य सेविकांना मुलांना जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्याचे काम देण्यात आले आहे. यासाठी अलबेंडाझोल (Albendazole) या गोळ्या आरोग्य सेविकांना वाटप करण्यास देण्यात आल्या आहेत. जानेवारी २०२२ मध्ये या गोळ्या बनवण्यात आल्या असून जानेवारी २०२३ मध्ये या गोळ्यांची मुदत संपणार आहे. या गोळ्या आरोग्य सेविका घराघरात जाऊन वाटप करत असताना. मात्र या गोळ्या पाकिटामधून काढताच त्याची पाऊडर झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य सेविकांनी या हलक्या दर्जाच्या गोळ्यांचे वाटप थांबवले असल्याची माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास यांनी दिली.