हैदराबाद - आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात धमाक्याने होत असते तशी ती कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाने झाली. अशातच आणखी एक संसदेशी संबंधित बातमी चर्चेत आली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Congress MP Shashi Tharoor) यांनी आज सकाळी केलेल्या ट्विटमुळे चर्चेचा उधाण आलंय. थरुर हे नेहमीच त्यांच्या अस्खलित इंग्रजीमुळे चर्चेत राहतात. खासदार शशी थरुर यांनी आज पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत सहा महिला खासदार(photo of Shashi Tharoor with women MPs) दिसत आहेत.
फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, "कोण म्हणतं लोकसभा हे कामासाठी आकर्षक ठिकाण नाही? आज सकाळी माझ्या सहा सहकारी खासदारांसोबत", असं लिहित त्यांनी सहा खासदारांच्या नावांना टॅग केले आहे. सुप्रिया सुळे,परनित कौर, नुसरत जहाँ, मिमि चक्रवर्ती, ज्योतिमणी आणि थामीझाची या सहा महिला खासदार फोटोत दिसतात.
शशी थरुर यांनी फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन चर्चेला उधाण आले असून टीका करणारे आणि कौतुक करणारे असे दोन गट यामुळे पडल्याचे चित्र आहे.
या फोटोत थरुर यांच्यासोबत सहाही महिला असल्यामुळे त्या फक्त सौंदर्यासाठी ओळखल्या जातात का असा सवाल केला जात आहे. लोकसभेचे कामकाज केवळ आकर्षक होण्यासाठी या महिला तिथे गेलेल्या नाहीत. त्या सभागृहाच्या सन्माननीय सदस्या आहेत, त्यांचा अपमान शशी थरुर यांनी केला आहे, अशीही टीका होत आहे.