मुंबई - मुंबईत गोवंडी येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुकसाना सिद्दीकी यांनी केली. ही मागणी महापालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीत केली आहे. टिपू सुलतान यांच्या नावाला भाजपाने तीव्र विरोध केला आहे. त्यानंतर भाजपाकडून मुंबईत इतर ठिकाणी टिपू सुलतान यांची नावे दिलेल्या रस्त्यांच्या नावाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे. यामुळे मुंबई महापालिकेत पुन्हा टिपू सुलतान नावाचा वाद पेटणार आहे.
मुंबई महापालिकेत टिपू सुलतान नावाचा वाद पुन्हा पेटणार नावाचा फेरविचार करा, ठरावाची सूचना -
मुंबईमधील अंधेरी भवन्स कॉलेज येथील शेर ए म्हैसूर टिपू सुलतान मार्ग तसेच गोवंडी येथील शहीद टिपू सुलतान मार्ग असे नाव देण्यात आले आहे. २००१ आणि २०१३ ही नावे देण्यात आली आहेत. या रस्त्यांना टिपू सुलतान यांचे नाव दिल्याचा फेर विचार करावा, अशी ठरावाची सूचना भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापालिका सभागृहात मांडली आहे. येत्या सभागृहाच्या बैठकीत ही सूचना चर्चेसाठी येणार असल्याने टिपू सुलतान नावावरून पुन्हा राजकीय वाद निर्माण होणार आहे.
अभिमान का बाळगावा -
टिपू सुलतान हा क्रूरकर्मा आणि धर्मांध होता. त्याचं नाव कुठेही या शहरात नको. इतर मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि इतर चांगल्या लोकांची नावं द्या. आम्ही त्यावेळी सत्तेत असलो तरी आम्ही कधीही अनुमोदन दिलेले नाही. २००१ आणि २०१३ मध्ये आम्हाला ठाऊक नव्हतं, आता कळतंय म्हणून आम्ही विरोध करतोय.आमची भूमिका स्पष्ट आणि, सेनेनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे शिंदे यांनी म्हटले आहे. पालिकेच्या निवडणुकीचा आणि याचा काहीही संबंध नाही. हिंदुत्ववाद्यांची ही मागणी आहे असे सांगत अशी टिपू सुलतान नाव देऊन अभिमान का बाळगावा ? असा प्रश्न प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे.