मुंबई -केंद्र सरकारने 58 प्रकारच्या आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी दिल्यानंतर ऍलोपॅथी विरुद्ध आयुर्वेदिक असा संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल (एमएमसी)ने डॉक्टरांना पाठवलेले एक पत्र, एमएमसीच्या नोंदणीकृत ऍलोपॅथी डॉक्टरांनी अन्य पॅथीच्या डॉक्टरांबरोबर काम करणे चुकीचे आहे, असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. महाराष्ट्र काऊंसील ऑफ इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) ने मात्र आता या पत्रावर आक्षेप घेतला आहे. हे पत्र म्हणजे पॅथी-पॅथीमध्ये भेदभाव करणारे आणि घटनाबाह्य आहे. त्यामुळे हे पत्र मागे घेण्याची मागणी करणारे पत्र एमसीआयएमने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पाठवले आहे. तर आमचे पत्र घटनाबाह्य नसल्याचे एमएमसीने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
ऍलोपॅथी विरुद्ध आयुष हा संघर्ष काही नवा नाही. पण मागील काही दिवसांपासून हा संघर्ष आणखी पेटला आहे. केंद्र सरकारने 58 आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी दिली आहे. अत्याधुनिक वैद्यक शास्त्रातील सर्जरी करण्यास आयुर्वेदिक डॉक्टरांना परवानगी दिल्याने, ऍलोपॅथी डॉक्टर नाराज झाले आहेत. हा रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचे म्हणत या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने आंदोलन केले आहे, 11 डिसेंबरला संप ही केला होता. हा वाद सुरू असतानाच आता एमएमसीच्या 15 डिसेंबरच्या पत्रावरून वाद सुरू झाला आहे. 15 डिसेंबरला एमएमसीने एक पत्र प्रसिद्ध करत ऍलोपॅथीच्या डॉक्टरांनी अन्य कोणत्याही पॅथीच्या डॉक्टरांबरोबर काम करू नये, त्यांच्यासोबत रुग्णांना उपचार देऊ नये असे या पत्रात नमूद केले आहे. तर असे करणे महाराष्ट्र वैद्यक व्यावसायी अधिनियम 1961 च्या कायद्यातील तरतुदीनुसार चुकीचे असल्याचे एमसीआयएमने म्हटले आहे. तसे पत्र त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना पाठवले आहे.