मुंबई : शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर ( Minister Eknath Shinde revolt ) राजकीय वातावरणात खळबळ ( Turmoil in Maharastra politics ) माजली आहे. या कारणास्तव महाविकास आघाडीच्या गोटात कमालीची चिंता पसरली आहे. काँग्रेसने आपल्या आमदारांची महत्त्वाची बैठक मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी घेतली. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंत्री अशोक चव्हाण, मंत्री अमित देशमुख, मंत्री यशोमती ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना थोरात यांनी सध्याच्या सर्व घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, तसेच गरज पडली तर तिन्ही पक्ष एकत्र चर्चा करू, असे सांगितले आहे.
काय म्हणाले थोरात : महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वातावरण निर्माण झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र काम करीत आहोत. एक वेगळं वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, या सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. माननीय मुख्यमंत्री यांच्याशीसुद्धा चर्चा झालेली आहे. ज्या गोष्टी आम्हाला न्यूज चॅनलकडून समजल्या आहेत, त्याच गोष्टी त्यांना समजल्या आहेत. याविषयी आम्हाला काही माहिती नाही. गरज वाटली तर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून यावर चर्चा करू. पण, सध्या तरी तशी परिस्थिती नाही आहे.
काॅंग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा : काँग्रेस हायकमांडबरोबर आम्ही नेहमी संपर्कात आहोत. एच. के. पाटील आमचे प्रभारी यांच्याशी बोलणं झालेले आहे. गरज वाटली तर ते सर्व आमदारांची प्रत्यक्षात बोलतील. त्याचप्रमाणे आमचे नेते कमळनाथ जी हे उद्या मुंबईत येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा होईल.