मुंबई - राज्यात वाढता कोरोना संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चर्चा झाली. राज्यातील शहरी भाग तसेच ग्रामीण भागात वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायोजना काटेकोरपणे अमलात आणाव्यात, अशा प्रकारची चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झाली.
"मी जबाबदार" मोहिमेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात काटेकोरपणे पालन व्हावी-
सध्या राज्यात कोविड परिस्थिती बिकट होत चालली असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्के घालने, वेळोवेळी हात धुणे, सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या "मी जबाबदार" या मोहिमे संदर्भात देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. "मी जबाबदार" मोहिमेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात काटेकोरपणे पालन व्हावी, जेणेकरून राज्यात वाढणारा कोरोना आटोक्यात आणला जाऊ शकेल. तसेच लसीकरण बाबत देखील सादरीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले.
यासोबतच आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपालांच्या अभिभाषणावर देखील चर्चा झाली. येणाऱ्या आर्थिक अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण होणार असून याबाबत सखोल चर्चा करण्यात आली आहे.
बैठकीत संजय राठोड यांच्या विषयी चर्चा-
पंधरा दिवस अज्ञातवासात असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे काल प्रसारमाध्यमांसमोर आले आणि आज त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील उपस्थिती लावली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून संजय राठोड यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची देखील नाचक्की झाली. यासोबतच पोहरादेवी येथे जमलेल्या गर्दीमुळे सरकारच्या प्रतिमेला देखील धक्का बसला असल्याची चर्चा काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत केली
हेही वाचा-रुग्ण वाढ सुरुच; बुधवारी राज्यात 8807 नवीन कोरोनाबाधित, 80 मृत्यू