मुंबई - यावर्षी कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू असतानाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मधील प्रवेशासाठी असलेल्या परीक्षांमध्ये अटींमध्येही सवलत दिली जाणार आहे. यात परीक्षेचे पर्सेंटाइल गुण ग्राह्य धरले जाणार नसून, यासाठीचा निर्णय जॉइंट एक्झाम बोर्डाने घेतला आहे. देशात जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत तर, जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार असून, यात यावर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
आयआयटी प्रवेशासाठी यंदा बारावीच्या पर्सेंटाइल गुणात सवलत! - जेईई मेन परीक्षा
देशात जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत तर, जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
या सवलतीसंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करत ही माहिती दिली. देशातील आयआयटींमधील प्रवेशांसाठी जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. जेईई मेन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अॅडव्हान्ससाठी पात्र ठरतात. मात्र, जेईई अॅडव्हान्स परीक्षा क्लिअर केल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेतील गुणदेखील ग्राह्य धरले जातात. बारावीत ७५ टक्के किंवा टॉप २० पर्सेंटाइल गुण आवश्यक असतात. यावर्षी ही अट शिथील करण्यात आली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. मात्र दोन गोष्टी अनिवार्य असतील. त्या म्हणजे एक तर बारावीची परीक्षा द्यावी लागेल आणि जेईई अॅडव्हान्स परीक्षा देखील क्लिअर करावी लागेल. मात्र, प्रवेशांच्या वेळी १२ वीतल्या गुणांच्या अनिवार्यतेतून सवलत मिळणार आहे.
देशभरातील सर्व आयआयटीतील तंत्रशिक्षण आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. सोबतच या प्रवेशासाठी बारावीत किमान ७५ टक्के गुण किंवा टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य असते. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना बारावीत किमान ६५ टक्के गुण आणि टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य असतात. नवीन सवलतीमुळे बारावीत कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.