मुंबई - जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईमध्ये रोज आपत्तीच्या घटना घडतात. यासाठी पालिकेने ( Mumbai Municipality ) महाविद्यालयीन विद्यार्थी ( College student ) नागरिकांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत प्रशिक्षण जागतिक आपत्ती जोखीम घट दिनाच्या ( World Disaster Day ) निमित्ताने आजपासून सुरु केला आहे. हे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी आपल्या महाविद्यालयात, सोसायटीत जाऊन तेथील किमान १० व्यक्तिंना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण ( Disaster Management Training ) द्यावे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक व्यापक स्तरावर साध्य करण्यासोबतच संभाव्य आपत्तींची जोखीम कमी करण्यास मदत होणार आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.
पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ -संयुक्त राष्ट्र संघाने दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी जागतिक आपत्ती जोखीम घट दिन पाळण्याचे निर्देशित केले आहे. या औचित्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांना संभाव्य आपत्तींबाबत व्यवस्थापन करणे सोपे व्हावे, यादृष्टीने ५ दिवसांचा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ आज झाला. या कार्यक्रमाला संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे तसेच के. सी. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना संजीव कुमार बोलत होते.