मुंबई -अमरावतीच्या राजापेठ येथे अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीवरून तयार झालेला वादातून काही लोकांनी पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकली होती. या घडलेल्या प्रकारणांनतर आमदार रवी राणा यांच्यासह काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र त्या घटनेवेळी आपण दिल्लीमध्ये असल्याचे रवी राणा यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी खुद्द गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी आज (सोमवारी) विधानसभेत केला.
खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षाकडून करण्यात आली. आमदार रवी राणा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था पोलीस महासंचालकांच्या मार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली.