मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस देखील विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे गदारोळाचा ठरला. याच गदारोळात आजच्या कामकाज पत्रिकेत नसलेले विषय देखील मंजूर करण्यात आले. यामध्ये राज्यातील सरपंचाच्या थेट निवडणुकीची पद्धत रद्द करणारे विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले.
विधानपरिषदेत दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे गदारोळाला सुरुवात झाली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुरुवातीला दोन वेळा व पुढे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली. विरोधकांकडून करण्यात आलेल्या या गदारोळातच सरपंचांच्या थेट निवडणुकीची पद्धत रद्द करणारे विधेयक मंजूर झाले. त्यासोबत कामकाज पत्रिकेत नसलेले परंतु विधानसभेने मंजूर केलेले ग्रामविकास खात्यातील सुधारणा विधेयक पुकारण्यात आले. सरपंचाच्या थेट निवडणुकीची पद्धत बंद करणारे हे विधेयक ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडले; आणि त्यावर कोणत्याही स्वरूपाची चर्चा न होता ते मंजूर करण्यात आले.
आजचा दिवस गदारोळाचा...
मंगळवारी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न प्रस्तावाच्या सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचे जाहीर केले. मात्र, हा स्थगन प्रस्तावाचा मुद्दा कसा होतो, हे सांगण्याची परवानगी दरेकर यांना दिली. त्यानंतर दरेकर यांनी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला. आपल्या आरोपांच्या पुष्टीसाठी दरेकर यांनी काही उदाहरणे देण्यास सुरूवात केली. त्याबरोबर सत्ताधारी बाकांवरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार, दिवाकर रावते, अंबादास दानवे आदी सदस्य आक्रमक झाले. सत्ताधारी आक्रमक होताच भारतीय जनता पक्षाचे सदस्य पुढे सरसावले. याचवेळी सभापतींनी प्रश्नोत्तरे पुकारली. त्याबरोबर विरोधक अधिक आक्रमक होऊन सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत गोळा झाले. तेथे त्यांनी काही कागदपत्रे फाडली. या सर्व प्रकारात निर्माण झालेला गदारोळ लक्षात घेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.
दुसऱ्यांदाही कामकाज तहकूब कामकाज पुन्हा सुरू होताच सभापतींनी मराठी भाषा दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती जाहीर केली. सभापतींची घोषणा पूर्ण होताच दरेकर यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित केला. कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत केव्हा देणार, बागायती शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रूपयांची मदत कधी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता फक्त १५ हजार शेतकऱ्यांना मदत होत आहे. त्याबरोबर पुन्हा सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्रमक झाले. त्यामुळे पुन्हा गदारोळ झाला आणि सभापतींनी सभागृहाचे कामकाज पुन्हा २३ मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु सभापतींनी त्यांना अनुमती न देता पुढे कामकाज रेटले. अतारांकित प्रश्नांची उत्तरे पटलावर ठेवण्यात आली. नियम ९३च्या सूचना पुकारण्यात आल्या. लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात आल्या. या गदारोळातच सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची घोषणा केली.