मुंबई -शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena rebel leader Eknath Shinde ) यांनी आता शिवसेनेलाच ( ShivSena ) कायद्याची भाषा सांगणे सुरू केले आहे. बंडखोर गटातील 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे करण्यात आली होती. त्यावर रोखठोक उत्तर देत शिंदे यांनी, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय, कायदा आम्हालाही कळतो, असे प्रत्यूत्तर दिले आहे.
कायदा आम्हाला कळतो - पक्ष संघटनेच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे आमच्या बारा आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिवसेनेने विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे काल केली होती. अरविंद सावंत यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्यूत्तर देत, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.
आमचीच शिवसेना खरी - कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत, अशी रोखठोक भाषा एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.