मुंबई -राज्यात सध्या भोंग्यावरून ( Mosque Loudspeakers Issue ) राजकीय वातावरण तापलेले असताना गृहमंत्र्यांनी मुंबईत पोलिस महासंचालकांची बैठक ( Meeting Between Home Minister And DGP ) घेतली. या बैठकीनंतर सुरक्षेच्या मुद्द्यावर काय पावले उचलली गेली आहेत, त्याचबरोबर येणाऱ्या दिवसात या संदर्भामध्ये कशा पद्धतीच नियोजन करण्यात आले आहे. याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. तसेच या संदर्भामध्ये सर्व राजकीय ( Dilip Walse Patil Will Hold Meeting between All Party Leader ) नेत्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली जाणार असून यामध्ये राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना सुद्धा आमंत्रित केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
सुरक्षेबाबत घेतला आढावा -याप्रसंगी बोलताना गृहमंत्री म्हणाले की, सध्या राज्यात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना आढावा मीटिंग घ्यायला सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी काल मीटिंग घेतली. त्या मिटिंग मधला आढावा त्यांनी दिला. पुढच्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू शकते व या संदर्भामध्ये काय उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून काय तयारी केली, याबाबतचा आढावा त्यांनी मला दिलेला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे व ती जबाबदारी आमच्यावर आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीरपणे घेत आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. संघर्ष काढू नका, तेढ निर्माण करू नका आणि अशा प्रकारची कृती कोणाकडूनही झाली, तर त्या संदर्भांमध्ये कठोर पद्धतीने कारवाई केली जाईल, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
भोंग्याबाबत राज्य सरकारचाही जीआर -मशिदीवरील भोंग्याबाबत बोलताना ते म्हणाले की, आता हा प्रश्न निर्माण झालेला पण तो काही नवीन नाही आहे. याअगोदर सुप्रीम कोर्टचा २००५चा जजमेंट आहे. २०१५ व २०१७ साली राज्य सरकारने यासंदर्भात जीआर काढला व लाऊड स्पीकरच्या संदर्भातली जी पद्धत आहे, ती पद्धत ठरवून दिलेली आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भांमध्ये सूचना संबंधितांना देण्यात येतील. परंतु या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी राज्यातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. काही संघटनांनादेखील बैठकीला बोलावून त्यांच्या सोबत सुद्धा चर्चा करणार आहे. मग याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा आमंत्रित केलं जाणार आहे असं गृहमंत्री म्हणाले.