मुंबई - राज्यात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. कोकणातील चिपळूण, रायगड परिसरात भयानक परिस्थिती होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने बचावकार्यात अडचणी आल्या, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अजून एखादा दिवस परिस्थिती राहील, अशी भिती ठाकरे यांनी व्यक्त केली. शुक्रवारी राज्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री आढावा घेतला, त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
नौदल, तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या तुकड्या मदतीला
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. अनपेक्षित असे संकट राज्यावर ओढवले. राज्यातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला असून पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार नौदल, तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या तुकड्या राज्यात पोहोचल्या आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पावसाचे संकट अनपेक्षित
राज्यात धो-धो पाऊस कोसळत असल्याने धरणे, नदी- नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक भाग पाण्याखाली गेल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. जीवितहानी होऊ नये, यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. एनडीआरएफ, आर्मी, हवाई दलामार्फत बचावकार्यही सुरु आहे. दुसरीकडे महाड येथे दरड कोसळून सुमारे ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक कुटुंब दरडीखाली अडकले. त्यांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. नागपूर, किनारपट्टी, महाबळेश्वर भागातही जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचे हे अनपेक्षित संकट असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
ढगफुटीचा अंदाज वर्तवता येत नाही
ढगफुटीचा नेमका अंदाज कोणालाही वर्तवता येत नाही. त्यामुळे ढगफुटी नेमक्या कोणत्या भागात होईल, हे माहिती नसते. कोकणात अनेक भागांमध्ये पूरामुळे रस्ते खचले आहेत. एनडीआरएफच्या पथकांनाही त्याठिकाणी पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. या आस्मानी संकटाशी मुकाबला करत सगळ्यातून मार्ग काढत पथके त्याठिकाणी पोहोचवली जात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोना आणि पुराचे दुहेरी संकट
राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. ज्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्याचठिकाणी पूर आला आहे. सर्वप्रथम जीवितहानी होऊ न देण्याचे काम सुरु आहे. पूर ओसरलेल्या भागात रोगराई पसरणार नाही, यासाठी त्याठिकाणी औषधे पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहेत. पाणी ओसरत जाईल, तशी मदत केली येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.