महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मराठवाड्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या; फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्रातून मागणी - fadnavis wrote letter to cm

अतिवृष्टी झालेल्या भागाचे वेगाने पंचनामे करून तत्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

fadnavis wrote letter to cm
संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 29, 2020, 8:49 PM IST

मुंबई - विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून प्रचंड उदासिनता दाखवली जात आहे. वेगाने पंचनामे करून तत्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, की दोन दिवसांपूर्वी संपूर्ण मराठवाड्याला अतिवृष्टीने झोडपले. यंदा चांगला मान्सून झाल्याने पेरणीक्षेत्रात वाढ होऊन अतिशय चांगली पिके आली होती. पण, या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, सुपीक मातीसुद्धा वाहून गेली आहे. जवळजवळ 1800 पेक्षा अधिक गावं यामुळे प्रभावित झाली. सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा तसेच अन्यही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही तालुक्यांमध्ये तर नुकसान हे 70 टक्क्यांच्या वर आहे. जालन्यासारख्या भागात मोसंबीचे मोठे नुकसान झाले आहे. सावरगाव, भिलपुरी, मौजपुरी, माणेगाव, नसडगाव आणि इतरही तालुक्यांमध्ये मूग, उडीद, सोयाबीन इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परभणीत अजूनही शेतात पाणी आहे. गंगापूर, खुलताबाद याही भागात मोठे नुकसान झाले. मूग, उडीद या पिकांना फटका बसला. काही शेतकर्‍यांनी माल शेतात काढून ठेवल्याने मुगाला तर शेतातच कोंब फुटले. हीच स्थिती मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आहे.

तसेच मराठवाड्यात घरांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णपणे खचला आहे. अशात केवळ मंत्र्यांनी दौरे करायचे आणि पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असे सांगून मोकळे व्हायचे, असे करून चालणार नाही. सरकारचे प्रमुख म्हणून जागोजागी पंचनामे होत आहेत की नाही, प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे, याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.

या पावसाने शेतकर्‍यांचे श्रमसुद्धा मातीमोल केले आहेत. त्यामुळे आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात सातत्याने हे अस्मानी संकट त्यामुळे मानसिकदृष्ट्या तो खचला आहे. याचवेळी त्याच्या पाठिशी सरकार म्हणून ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येसुद्धा अतिवृष्टीचा फटका बसला आहे, असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

पुढे फडणवीस यांनी पत्रात म्हटले, की विदर्भात पूर आला तेव्हाही सरकारकडून मदत करू, अशा घोषणा केल्या पण, केवळ तोंडदेखली मदत करायची म्हणून 16 कोटी रुपयांची मदत केली. त्यानंतर आता कोणतीही मदत केली जात नाही. विदर्भातील पूरग्रस्तांसोबत अन्याय केल्यानंतर आता मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जाऊ नयेत, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून थेट मदत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी, अशी आपल्याला विनंती आहे. केवळ घोषणा करून, पंचनाम्याचे आदेश दिले, असे सांगून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. बांधावर जाऊन जी मदत आपण जाहीर केली, तशीच ठोस मदत कधीतरी आपल्याला मिळेल, अशी शेतकर्‍यांना आस आहे. निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी यात ती मिळू शकली नाही. आता किमान मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तरी द्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details