नागपूर -महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या तक्रारीवरून भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राजकीय हेतूने त्यांच्यावर गुन्हा दाखल (FIR On Ashish Shelar) करण्यात आला असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. आशिष शेलार हे कधीही महिलांचा अपमान होईल असे वक्तव्य करणार नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. आशिष शेलार हे आक्रमकपणे शिवसेनेविरुद्ध बोलतात म्हणून कदाचित त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असावा, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते असा आरोप आहे. त्याची दखल महिला आयोगाने घेतली होती. किशोरी पेडणेकर यांनी मरीन लाईन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांनी केलेल्या विधानाबाबत गृहमंत्र्यांकडे तक्रार नोंदवली होती.
वरळी बीडीडी चाळ येथे मागील आठवड्यात मंगळवारी सिलेंडर स्फोट झाला होता. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. या घटनास्थळाला मुंबईच्या महापौरांनी उशिरा भेट दिली होती. याबाबत टीका करताना मुंबईत झालेल्या सिलेंडर स्फोटानंतर 72 तासांनी महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे होता असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी महापौर यांना केला होता. महापौरांवर टीका करताना आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
- शेवटी बावनकुळे हेच जिंकणार -
स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारासंदर्भात संशयकल्लाळ आहे. यावर प्रतिक्रिया देताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की निवडणुकीत विजयाची माळ भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच गळ्यात पडेल, त्यामुळे काँग्रेसने आपला उमेदवार बदलला किंवा नाही बदलला तरी काहीही फरक पडणार नाही.
- संजय राऊतांनी संयमाने बोलावे-
सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि १३ सैन्य अधिकारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. या अपघाताच्या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शंका व्यक्त केली आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की इतक्या संवेदनशील विषयावर संजय राऊतांनी संयमाने बोलले पाहिजे.