मुंबई -राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु, हे निर्बंध लॉकडाऊनसारखे असल्यामुळे व्यापारी वर्गांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध व्यापारी संघटनांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले. कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे एकूणच अर्थकारणाला, यातून केवळ व्यापार नाही, तर श्रमिकांच्याही अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे. त्यामुळे तातडीने या निर्बंधांबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हेही वाचा -शिवथाळी : पार्सल देण्याचा आदेश आलेला नाही; महापालिकेतील कॅन्टीन चालकाची माहिती
यात फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, हिंदुस्तान चेंबर ऑफ कॉमर्स, मेटल अँड स्टेनलेस स्टील मर्चंट्स असोसिएशन, फॅब्रिक मर्चंटस असोसिएशन, भारत मर्चंट चेंबर्स, कन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, वैश्य महासंमेलन, नॅसकॉम आणि इतरही संस्थांचा समावेश होता. या व्यापारी बांधवांनी यावेळी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. गेल्यावर्षी लॉकडाऊन लागला, त्यावेळी आम्ही सहकार्य केले. पण, आता पुन्हा इतके कठोर निर्बंध हे आत्महत्येसारखेच पाऊल ठरेल, असे संघटनांनी सांगितले. अशाप्रकारचे निर्णय घ्यायचेच असतील, तर सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना एकदा तरी बोलावून ऐकून घ्यायला हवे होते, अशाप्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.