महाराष्ट्र

maharashtra

पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत लपून-छपून बहुमत सिद्ध करण्यावर चर्चा - फडणवीस

By

Published : Nov 29, 2019, 11:52 AM IST

Updated : Nov 29, 2019, 1:07 PM IST

उद्धव ठकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेच नवीन सरकारची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. यावेळी शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा न करता फक्त बहुमत कसे सिद्ध करायचे, यावरच चर्चा झाली असल्याचे फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस

मुंबई- भाजपसोबत शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात सेनेने सत्तास्थापन केली आहे. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली, असे म्हणत फडणवीस यांनी नवीन सरकारवर निशाणा साधला.

हेही वाचा -#CMO ट्विटरवरून फडणवीसांचा फोटो चेंज...फेसबुकवर मात्र तोच

दरम्यान, उद्धव ठकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेच नवीन सरकारची पहिली कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा न करता फक्त बहुमत कसे सिद्ध करायचे, यावरच चर्चा झाली असल्याचे फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? नियमबाह्य पद्धतीने हंगामी अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? स्वतःच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर केली आहे.

भाजपने विरोधीपक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? असाही प्रश्न उपस्थित करत, महाराष्ट्राला याचे उत्तर हवे असल्याचे फडणवीस यांनी ट्विट केले. दरम्यान, नवीन सरकार स्थापन झाल्यावर लगेच भाजपने विरोधाची भूमिका सुरू करत महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

फडणवीस ट्रोल

देवेंद्र फडणवीस यांच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी त्यांनाधारेवर धरत तुम्ही पाच वर्ष काय केले? असा प्रश्न विचारला. तसेच मागील ५ वर्षात तुम्ही शेतकरी संपवायची कामं केल्याचेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Last Updated : Nov 29, 2019, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details