मुंबई -केंद्रीय गृह सचिवांना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात दिलेला अहवाल हा लवंगी फटाका आहे की बॉम्ब आहे हे लवकरच समजेल असा सुचक इशारा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिला आहे. फोन टॅपिंग आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजे कोणताही बॉम्ब नसुन तो एक वात नसलेला लवंगी फटाका असल्याची टीका राऊत यांनी केली होती. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज (बुधवारी ) फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यानंतर पत्रकारांबरोबर ते बोलत होते.
दिल्लीत दिलेल्या अहवालानंतर सरकार घाबरले
दिल्लीत मंगळवारी केंद्रीय गृह सचिवांना पोलिसांच्या बदल्या संदर्भात दिलेल्या अहवालानंतर सरकार घाबरले आहे. त्यांचा खरा चेहरा आता जनते समोर येईल असेही फडणवीस पत्रकारांबरोबर बोलताना म्हणाले. गुप्त माहिती फोडल्याचा आपल्यावर आरोप होत आहे. तसे असेल तर सरकारने आपल्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.
मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते करावे
या संपुर्ण प्रकरणात मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. त्यांनी या प्रकरणी सरकार म्हणून खुलासा करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ती फाईल दाबून ठेवली होती असा आरोप फडणवीसांनी केला. राज्यात घडत असलेल्या घडामोडींचा आढावा राज्यपालांना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री काही बोलत नसतील तर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलते करावे अशी विनंती राज्यपालांना केल्याचे त्यांनी सांगितले.