मुंबई - महाविकास आघाडीला लवकरात लवकर बहुमत सिद्ध करायला सांगावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांनी राज्यपालांची राजभवनावर भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी ही मागणी केली आहे.
ठाकरे सरकारकडे बहुमत नाही -देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यपालांकडे ठाकरे सरकारला तातडीने बहुमत सिद्ध करायला लावण्याच्या मागणीचे पत्रं दिले. फडणवीस यांनी म्हटले आहे की, आज राज्यपालांना आम्ही ईमेलद्वारे व प्रत्यक्ष भेटून पत्र दिलेले आहे. सध्या राज्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहायचं नाही आहे. त्या कारणासाठी ते महाविकास आघाडी किंवा सरकारमधून बाहेर पडत आहेत. त्यामुळे हे सरकार अल्पमतात आलेल आहे. ठाकरे सरकारकडे बहुमत नाही. यासाठी राज्यपालांनी बहुमत चाचणी घ्यावी, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे.