मुंबई- महाविकास आघाडी सरकारमधील वादंग आपण पाहताच आहोत, कुणाचा कुणाला मेळ दिसत नाही. हे सरकार आपल्या कर्माने आणि अंतर्गत विरोधाने कोसळेल. त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देऊ, असे विधान विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथे आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीस यांची ओबीसी राजकीय आरक्षणाच्या विषयावर भेट घेतली होती.
...तेव्हाच राज्याला पर्यायी सरकार देऊ महाविकास आघाडीत अस्थिरता -
महाविकास आघाडीचा कारभार कसा चाललाय हे आपण पाहताच आहोत. स्वबळाची भाषा केली जाते. त्यावर आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार घटक पक्षाच्या नेत्यांना सुनावत आहेत. घटक पक्षांचे नेते पवार साहेबांची भेट घेतात. मात्र त्यात नाना पाटोले यांना वगळलं जाते. अशा कारभाराने हे सरकार आपल्याच वजनाने कोसळेल. कधी कोसळेल असे भाकीत आम्ही कधीही केले नाही, मात्र जेव्हा कोसळेल तेव्हा पर्यायी सरकार देऊ असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.
बहुमत असताना का घाबरता? -
सरकराकडे बहुमत आहे. या जोरावर ते पाच वर्ष पूर्ण करतील असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातो. मग विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी ते आवाजी मतदान घेण्याचा का प्रयत्न करत आहे? असा सवाल फडणवीस यांनी केला. खऱ्या अर्थाने कोरोनाकाळात निवडणुकीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच विधान मंडळातील निवडणुकीचे नियम बदलण्यासाठी विधिमंडळाची नियम समिती असते. पण अध्यक्षांच्या नेतृत्त्वात या नियम समितीची बैठक घेऊन नियम ठरवले जातात. मात्र हे सरकार सर्व नियम पायदळी तुडवत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
ओबीसी आरक्षणासाठी सरकारला मदत करू -
फडणवीस म्हणाले की, भुजबळ साहेबांनी आज भेट घेतली या भेटीत त्यांनी ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा केली. ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा त्यासाठी विरोधीपक्ष म्ह्णून आम्ही त्यांना मदत करू. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डेटा सरकारने मिळवावा, यासाठी न्यायालयाच्या सूचनेनुसार आयोग नेमावा. ज्याप्रकारे युती सरकारने मराठा आरक्षणासाठी डेटा गोळा केला आणि तो डेटा सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केला होता. यासंदर्भातील माहिती आम्ही भुजबळ यांना देण्यासाठी तयार आहोत. शेवटी सत्तारूढ पक्षाने नेतृत्व करायचे असते. ते त्यांनी करावं, आम्ही त्यांना मदत करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पंकजा मुंडेंबाबत फडणवीसांचे मौन -
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळा विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना संधी न मिळाल्याने मुंडे कुटुंबीय नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसमोर आपण नाराज नसून योग्यवेळी निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. त्याबरोबर पंकजा यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह असल्याचे सांगत फडणवीस यांचा उल्लेख टाळला होता. यावर फडणवीस यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंडे यांच्या संदर्भात मत व्यक केले असून यावर अधिक बोलणे योग्य नाही, असे सांगत फडणवीस यांनी या प्रश्नाला बगल दिली.