मुंबई- कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत असताना यातील बहुसंख्य रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील सुमारे 60 टक्के खाटा रिक्त आहेत. रुग्णांना सोयी व सुविधा देऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिका सज्ज असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत 14 मार्च रोजी कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 43 हजार 947 वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा 11 हजार 531 वर तर रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 17 हजार 579 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 13 हजार 247 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के आहे. तर रुग्ण संख्या दुप्पटीचा कालावधी 176 दिवस इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 35 लाख 58 हजार 359 चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा-नवरी मिळे नवऱ्याला! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युवकावर लग्नाच्या प्रस्तावांचा अक्षरश: वर्षाव
५० टक्क्यांहून अधिक खाटा रिकाम्या -
मुंबईत रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून डिसीएचसी व सीसीसी 2 जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या कोविड सेंटरमध्ये 13 हजार 585 खाटा आहेत. त्यापैकी 5,495 खाटांवर रुग्ण आहेत. तर 8 हजार 90 खाटा रिक्त आहेत. याचाच अर्थ 61 टक्के खाटा रिक्त आहेत. कोविड सेंटरमधील डिसीएचसी या प्रकारात गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी 5 हजार 888 खाटा आहेत. त्यापैकी 3 हजार 841 म्हणजेच 62 टक्के खाटा रिक्त आहेत. तर 2 हजार 247 म्हणजेच 38 टक्के खाटांवर रुग्ण आहेत. डिसीएचमध्ये गंभीर आजार नसलेल्या रुग्णांसाठी 7 हजार 110 पैकी 4 हजार 117 म्हणजेच 58 टक्के खाटा रिक्त आहेत. त्यातील 2 हजार 993 म्हणजेच 42 टक्के खाटांवर रुग्ण आहेत. तर सीसीसी 2 मध्ये 587 पैकी 332 म्हणजेच 57 टक्के खाटा रिक्त आहेत तर 255 म्हणजेच 43 टक्के खाटा भरलेल्या आहेत.