मुंबई - निवासी डॉक्टरांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या अर्थ तसेच आरोग्य सचिव यांच्यासोबत मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र त्यातून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मार्ड प्रतिनिधींनी सांगितले.
राज्यातील निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवार १ ऑक्टोबरला सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सरकारी आणि पालिका रुग्णालयातील ओपीडीवर याचा परिणाम झाला आहे. अर्थ व आरोग्य सचिवांना निवासी डॉक्टरांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश आले नाही.
हेही वाचा-उस्मानाबाद हादरले; 10 वर्षीय चिमुकलीवर पंरड्यात बलात्कार; पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू
बेमुदत काम बंद आंदोलन -
गेले दोन वर्ष निवासी डॉक्टर हे कोरोना सेवेमध्ये असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवलेला नाही. तेव्हा शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत मंत्री अमित देशमुख यांनीही या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही यावर ठोस कार्यवाही विभागाने केलेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.