मुंबई -अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून इतर अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्यात यावे, अशी मागणी महिला आयोगाकडे वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.
दीपाली चव्हाण यांच्या सुसाइड नोटमध्ये काही वरीष्ठ अधिकार्यांच्या नावाचा उल्लेख-
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणाऱ्या हरीसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकार्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे माध्यमाद्वारे समोर आले आहे. दीपाली चव्हाण यांच्या सुसाइड नोटमध्ये काही वरीष्ठ अधिकार्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या अनुषंगानेच उपवनसंरक्षक शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अप्पर प्र. मु. व. संरक्षक तथा क्षेत्र संचालक रेड्डी यांच्या नावाने लिहीलेल्या सुसाईड नोट मध्ये दीपाली चव्हाण यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.
रेड्डी देखील दोषी-
अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर क्षेत्र संचालक रेड्डी यांनी शिवकुमार विरोधात केलेल्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे महिला अधिकाऱ्याचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात रेड्डी देखील दोषी असल्याचे वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोषी असलेल्या सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचीतच्यावतीने करण्यात आली आहे.
दीपाली चव्हाण प्रकरणात शिवकुमार व इतर अधिकारी यांच्याबाबत जे गंभीर आरोप करण्यात आले आहे, अशा अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच वन विभागाचे सीसीटीव्ही डेटा जप्त करून त्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत पोलीस महासंचालक व मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र, वनविभाग सिव्हिल लाइन्स नागपूर यांच्याकडे तक्रारींचे निवेदन देण्यात आले आहे.
हेही वाचा-राज्यात कोरोना स्थिती गंभीर.. लॉकडाऊनच्या दृष्टीने नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश