मुंबई- मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणांवर बंधने आली असल्याने सर्व धर्मीय सण साधे पणाने साजरे केले जात आहेत. बुधवारी बकरी ईद असून त्यानिमित्त कुर्बाणी देता यावी यासाठी महापालिकेचा देवनार येथील कत्तलखान (पशुवधगृह) २१ ते २३ जुलै दरम्यान सुरू ठेवण्यात आला आहे. येथे दिवसाला ३०० जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती देवनार पशुवध गृहाचे महाव्यवस्थापक योगेश शेटे यांनी दिली.
बकरी ईद : देवनार पशुवधगृह ३ दिवस सुरू, दिवसाला ३०० जनावरांच्या कत्तलीला परवानगी - Bakird
बकरी ईदसाठी मुंबई महापालिकेचे देवनार पशुवध गृह सज्ज झाले आहे. बुधवार २१ पासून २३ जुलैपर्यंत पशुवधगृहामध्ये दिवसाला ३०० म्हैस आणि रेडे अशी मोठी जनावरे कत्तल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत मोठ्या जनावरांची कत्तल या पशुवधगृहात करता येईल असे शेटे यांनी सांगितले.
दिवसाला ३०० जनावरांची कत्तल -
मुंबईत कोरोनाचा प्रसार गेले दीड वर्ष आहे. या दीड वर्षाच्या काळात सर्व धर्मीयांनी महापालिका आणि राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत सण साधेपणाने साजरे केले आहेत. यंदा मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा मुंबईकरांना निर्बंधांमध्ये राहावे लागत आहे. त्यातच मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण बुधवारी साजरा केला जात आहे. या सणानिमित्त मुस्लिम धर्मीयांकडून प्राण्यांची कुर्बाणी दिली जाते. बकरी ईदसाठी मुंबई महापालिकेचे देवनार पशुवध गृह सज्ज झाले आहे. बुधवार २१ पासून २३ जुलैपर्यंत पशुवधगृहामध्ये दिवसाला ३०० म्हैस आणि रेडे अशी मोठी जनावरे कत्तल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत मोठ्या जनावरांची कत्तल या पशुवधगृहात करता येईल असे शेटे यांनी सांगितले.
यंदा बकरा बाजार नाही -
देवनार पशुवधगृहात दरवर्षी दोन लाखाहून अधिक बकऱ्यांची विक्री केली जाते. त्यासाठी याठिकाणी देशभरातून व्यापारी बकरे विकण्यासाठी येतात. काही हजारांपासून ११ लाखापर्यंत किमतीचे बकरे याठिकाणी विक्री केले जातात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरा बाजार भरवण्यात आला नसल्याची माहिती शेटे यांनी दिली.
न्यायालयाचे निरीक्षण -
शहरातील मुस्लीमांची संख्या लक्षात घेता दिवसाला एक हजार जनावरांची कत्तल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लीम नागरिकांनी पालिकेकडे केली होती. मात्र पालिकेने दिवसाला ३०० जनावरांचीच कत्तल करण्यास परवानगी दिली आहे. शिवाय उच्च न्यायालयाने कोरोना काळात महापालिकेने देवनारमध्ये कुर्बानीसाठी बनवलेली नियमावली ही योग्यच असल्याचे सांगत मर्यादित संख्येपेक्षा जास्त जनावरांच्या कत्तलीस परवानगी नाकारली आहे. लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.