मुंबई - मागील आठवड्याभरापासून मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट होत आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडा साडेसहा लाखांहून साडेपाच लाखांवर आला आहे. असे असले तरी अजूनही राज्यातील ऑक्सिजनची मागणी काही कमी होताना दिसत नाही. आजही राज्याला 1650 मेट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज लागत आहे. राज्यातून 1350 मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता होत असून उर्वरित साठा इतर राज्यातून मोठ्या प्रयत्नाने आणत राज्याची गरज भागवली जात आहे. मात्र पुढचे 10 दिवस ही मागणी तशीच राहण्याची शक्यता असताना कर्नाटकातून मिळणारा 130 मेट्रिक टनचा ऑक्सिजनचा साठा एक-दोन दिवसांत मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा मुलबक पुरवठा करण्यात पुन्हा अडचणी येण्याची शक्यता असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील(एफडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
उर्वरित ऑक्सिजन कुठून आणायचा ?
कोरोना पूर्व काळात राज्यात वैद्यकीय वापरासाठी 350 ते 400 मेट्रिक गरज होती. पण कोरोनाचा कहर वाढल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 मध्ये वैद्यकीय वापरासाठी थेट 850 मेट्रिक टन ऑक्सिजन लागू लागला. अशात राज्यात केवळ 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत होते आणि त्यातील मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन, उद्योगासाठी वापरला जात होता. त्यामुळे ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी औद्योगिक वापरासाठी केवळ 20 टक्के ऑक्सिजन वापरला जाऊ लागला. तर 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वापरला जाऊ लागला. त्यामुळे पहिल्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा भासला नाही. पण दुसरी लाट खूपच मोठी आली आणि रुग्णसंख्या दिवसाला 60 हजाराच्या पुढे जाऊ लागली. सक्रिय रुग्ण वाढले, गंभीर रुग्ण वाढले. परिणामी एप्रिलमध्ये राज्याला दिवसाला 1600 ते 1800 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज निर्माण झाली. राज्यात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होत असताना उर्वरित ऑक्सिजन कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण झाला होता.
राज्यातील ऑक्सिजनचे उत्पादन 100 मेट्रिक टनने वाढले -
100 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वापरुनही गरज पूर्ण करता येत नसल्याने राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवता येते का याचा विचार झाला. त्यातूनच महिन्याभरात 150 मेट्रिक टनचे उत्पादन वाढवण्यात यश मिळाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. 100 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन जेएसडब्ल्यू कंपनीने वाढवले आहे. तर 50 मेट्रिक टनचे उत्पादन इतर कंपन्यांनी वाढवले आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे केले जात आहेत. तेव्हा येत्या काळात राज्यातील ऑक्सिजनच्या उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.