मुंबई -महापालिकेकडे 70 हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्यामुळे त्यांनी नागरिकांचं मोफत लसीकरण करावं अशी मागणी मुंबई भाजपानं महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे. भाजपानं मनपा आयुक्त चहल यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. कोरोनामुळं त्यांना आधी भेट नाकारण्यात आली होती. पण भाजपा नेत्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर भेटीची परवानगी देण्यात आली.
मुंबईतील कोरोनाच्या रुग्ण संख्येवरून आणि इतर मुद्द्यांवरून सध्या महापालिका आणि भाजपा आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महापालिका कोरोनावर नियंत्रण आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून पाठ थोपटून घेत असताना, दुसरीकडे मात्र भाजपाने महापालिका दाखवत असलेली आकडेवारी खोटी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं रविवारी भाजपाच्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांना भेटीसाठी वेळ मागितला होता. मात्र अशा बैठकांना शासनानं बंदी घातली आहे असं सांगत त्यांना भेट नाकारण्यात आली. त्यावर विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलनाचा इशारा देताच आयुक्तांनी भेटीसाठी भाजपाला वेळ दिला.