मुंबई -इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 10 वी व 12 वीच्या परीक्षांची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. मात्र अद्यापही 9 वी आणि 11 वीच्या परीक्षांबाबत निर्णय न घेण्यात आल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण मंत्र्यांनी लवकरात लवकर 9 वी आणि 11 वीच्या परीक्षेबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी पालक संघटना आणि शिक्षण तज्ज्ञांकडून केली जात आहे.
टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंडया यांनी सांगितले की, शिक्षणचा अधिकार 2009 अनुसार दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केले जाते. दर वर्षी 15 एप्रिलपर्यंत वार्षिक परीक्षा संपत असतात. मात्र यंदा अद्यापही शौक्षणिक सत्र संपलेले नाही. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपेक्षा 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन कसे केले जाणार, त्यांच्या परीक्षेचे स्वरूप कसे असावे याचा निर्णय घ्यावा. म्हणजे या विद्यार्थ्यांना पुढील तयारीला सुरुवात करता येईल. दहावी व बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.