मुंबई- मुंबईत गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार अद्याप कमी झालेला नाही. असे असताना मुंबई महापालिकेच्या मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक आदी पदांसाठी परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची परिस्थिती असताना या उमेदवारांचा जीव धोक्यात घालणे योग्य ठरणार नाही, यासाठी या परिक्षा रद्द कराव्यात अशी मागणी पालिकेतील कर्मचारी संघटनांनी महापौर किशोरी पेडणेकर व आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे केल्याचे महापालिका कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य लिपिक पदाच्या परीक्षा रद्द करा- कामगार संघटनांची मागणी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष -
कोरोना महामारीने जगभर थैमान मांडले आहे. सध्या या महामारीच्या तिसऱ्या लाटेला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. गेली दीड वर्षे या महामारीला मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी तन-मन-धन अर्पून लढा देत आहेत. मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी कोविड-१९ महामारीच्या विरोधातील लढ्यात अग्रणीचे कोविड योद्धे म्हणून कामात व्यस्त असताना पालिका प्रशासनाने लिपिकीय संवर्गासाठी मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक, वरिष्ठ लेखापरीक्षा सहाय्यक या पदाकरिता ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत परीक्षा आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळे लिपिकीय संवर्गाच्या कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन कोणत्याही क्षणी औद्योगिक शांततेचा भंग होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.
यांना दिले निवेदन -
मुंबई महानगरपालिकेतील निम्म्याहून अधिक लिपिकीय संवर्गातील कर्मचारी वर्गाने वयाची ४५ वर्षाहून अधिक वर्षे पार केलेली असल्याने आणि महापालिका प्रशासनाने लिपिकीय संवर्गासाठी असलेल्या संबंधित परीक्षा विहित वेळेत न घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये या परीक्षेविषयी औदासिन्य निर्माण होऊन त्यांच्या आत्मविश्वासाला तडा गेला आहे. त्याच बरोबर सदर कर्मचारी कोविड महामारीपुळे मानसिक तणावाखाली आहेत. या कारणांसाठी कोविड महामारीच्या काळात सदर परीक्षा रद्दबातल करण्यासह इतर मागण्यांचे पत्र कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी महापौर, उप महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता, सर्व गटनेते आणि पालिका आयुक्तांना दिल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी महापालिका कार्यलयीन कर्मचाहरी संघटना, नगरपालिका कामगार संघटना, हिंदुस्थान कर्मचारी संघ, महापालिका शिक्षक सभा, नगरपालिका संघटना आदी कामगार संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
कामगारांच्या मागण्या -
मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक, वरिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यक या पदासाठी दिनांक ६ ते ८ ऑगस्ट या दरम्यानच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेली परीक्षा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात यावी. मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक, वरिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यक या पदांच्या कालपद पदोन्नतीसाठी लिपिकीय संवर्गासाठी असलेली खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होण्याची असलेली अट शिथिल करून त्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी.
हेही वाचा -राज्यात डेल्टा प्लसचा कोणताही नवा रुग्ण नाही - राजेश टोपे