मुंबई -धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मागील 16 वर्ष धारावीकरांबरोबर खेळ सुरू आहे, हा खेळ थांबवा आणि धारावी प्रकल्प रद्द करा अशी मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प समितीने केली आहे. प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प समितीच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अॅड. राजू कोरडे यांनी दिली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प 2004मध्ये हाती घेण्यात आला होता. पण आज 16 वर्षे झाली तरी हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. या प्रकल्पासाठी तब्बल तीनदा निविदा काढण्यात आल्या आहेत. पण एकदा ही निविदा मंजूर करण्यात आली नाही. आता तिसऱ्यांदा निविदा रद्द करत चौथ्यांदा निविदा काढली जाणार आहे. एकूणच निविदेतच ही प्रक्रिया रखडली आहे. तर दुसरीकडे धारावी प्रकल्प मार्गी लागावा यासाठी आम्ही गेल्या 16 वर्षांत मोर्चे काढले, निदर्शने केली, उपोषणं केली. पण याचा काहीही फायदा झाला नाही. आम्ही 16 वर्षानंतरही पुनर्विकासाची प्रतीक्षाच करत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी राजू कोरडे यांनी व्यक्त केली.