मुंबई - भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे. यासाठी महापालिकेच्या शाळांमधून भगवद्गीता पठन करावे, अशी मागणी भाजपा नगरसेविकेने महापालिका सभागृहकडे ( Teach Bhagwat Geeta In Mumbai School ) केली आहे. तसा प्रस्ताव महानगरपालिकेच्या येत्या सभेमध्ये मांडला जाणार आहे. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून हिंदुत्वाचे कार्ड खेळले जात आहे. त्यांच्या नगरसेविकेकडून करण्यात आलेल्या या मागणीमुळे येत्या काळात भाजपा विरुद्ध इतर पक्ष, असा राजकीय वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो
याबाबत बोलताना भाजपा नगरसेविका योगिता कोळी म्हणाल्या की, भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. तसेच हा ग्रंथ वेदांच्या अखेरच्या रचनेतील 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. ५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. भगवद्गीता हा हिंदुस्थानातला महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला संदर्भग्रंथ आहे.