मुंबई - गेल्या दीड ते दोन वर्षापासून राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला आहे. कोरोनाची दुसरी लाटही येऊन गेली. ती मृत्यूच्या पातळीवर जास्त घातक ठरली. आता ही दुसरी लाट मोठ्या प्रमाणात ओसरली आहे. राज्यात काही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये काल १ ऑगस्ट रोजी राज्यातील तब्बल ३३ पालिका व जिल्हांमध्ये एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, शून्य रुग्णांची नोंद होणाऱ्या विभागांची संख्या वाढत असल्याने, मृत्युदर कमी होण्यास मोठी मदत होईल, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
शून्य मृत्यूच्या विभागांची संख्या वाढतेय -
कोरोना विषाणूचा गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून प्रसार सुरु झाला आहे. हा प्रसार सुरु झाल्यापासून राज्यातील पालिका, महापालिका व जिल्हा प्रशासन अशा ६१ विभागांकडून कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची, बरे झालेल्या रुग्णांची तसेच, मृत्यूंची संख्या राज्याच्या आरोग्य विभागाकडे एकत्रित केली जाते. यामधून राज्यातील एकूण कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या, एकूण मृत्यू तसेच, बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत रोज अहवाल प्रसिद्ध केला जातो.
शून्य मृत्यूंची नोंद होणाऱ्या विभागांच्या संख्येत वाढ
राज्य सरकारकडून कोरोना विषाणूबाबत जाहीर करण्यात येणाऱ्या अहवालानुसार (२७ जुलै रोजी २६), (२८ जुलै रोजी २९), (२९ जुलैला २६), (३० जुलैला ३०), (३१ जुलैला ३२) तर, (१ ऑगस्ट रोजी ३३) पालिका, महापालिका आणि जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. शून्य मृत्यूंची नोंद होणाऱ्या विभागांच्या संख्येत वाढ होत असल्याने आणि मृत्यूंची संख्या कमी होत असल्याने, मृत्युदर कमी होईल अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.