नवी दिल्ली : उद्योजक मुकेश अंबानींच्या घरासमोर स्कॉर्पिओत स्फोटके आढण्याच्या प्रकरणाचा संबंध थेट तिहार तुरूंगाशी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची जबाबदारी घेणाऱ्या जैश-उल-हिंदचा टेलिग्राम ग्रुप तिहारमधील एका मोबाईल नंबरवरून तयार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी तपासासाठी स्पेशल सेलचे पथक तिहार प्रशासनाची मदत घेत आहे.
स्पेशल सेलकडून तिहार तुरूंगात तपास
या प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला दिली. यानंतर स्पेशल सेलचे पथक गुरूवारी तिहारमध्ये दाखल झाले. या प्रकरणी संबंधित मोबाईलचा शोध स्पेशल सेलकडून घेतला जात आहे. दरम्यान, तपासात तुरूंगातील एका बराकमध्ये छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. एका दहशतवाद्याच्या बराकमधून एक मोबाईल जप्त केल्याचीही माहिती सूत्रांकडून समजते आहे.