महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सिलिंडर स्फोटातील रुग्णांच्या उपचारांमध्ये दिरंगाई, खात्यांतर्गत चौकशीचे आदेश - सिलिंडर स्फोटात चार जण भाजले

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात भाजलेल्या चार जणांना मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आज दाखल करण्यात आले आहे. रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाच्या खाते अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

cylinder explosion Worli
cylinder explosion Worli

By

Published : Nov 30, 2021, 8:08 PM IST

मुंबई - वरळीतील कामगार वसाहतीमध्ये एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होवून त्यात भाजलेल्या चार जणांना मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आज दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या उपचारांमध्ये दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप करणारी एक चित्रफित समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाली असून त्याची तत्काळ दखल घेत संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी या प्रकरणी खाते अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.

चौकशीचे आदेश -

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला आणि एक पुरुष असे चौघे जण भाजले आहेत. घटनास्थळी महानगरपालिका अग्नीशमन दल, विभाग कार्यालयातील यंत्रणा तसेच पोलीस यांनी मदतकार्य करुन चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तथापि, रुग्णालयात संबंधित रुग्णांवर उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याचा आरोप करणारी चित्रफित निदर्शनास आली असून त्याची तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नायर रुग्णालयाचे उप-अधिष्ठाता सदर दिरंगाई प्रकाराची चौकशी करणार आहेत. चौकशी अंती कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार व कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गॅस सिलेंडर स्फोट -

गणपतराव जाधव मार्ग बीडीडी चाळ क्रमांक 3, कामगार वसाहत, वरळी येथे एका घरात आज सकाळी 7.11 वाजता गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घरामध्ये आग लागली. याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत जखमी झालेल्या 4 जणांना मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रकृती गंभीर असलेल्यांमध्ये एका 4 महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. गॅस सिलेंडरमुळे लागलेली आग विझवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

जखमींची नावे -
आनंद पुरी 27 वर्षे (गंभीर)
मंगेश पुरी 4 महिने (गंभीर)
विद्या पुरी 25 वर्षे (प्रकृती स्थिर)
विष्णू पुरी 5 वर्षे (प्रकृती स्थिर)

ABOUT THE AUTHOR

...view details