मुंबई - कार्डिलिया क्रूझवर(Cruise Drug Case) 2 ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. या प्रकरणांमध्ये नवाब मलिक(Minister Nawab Malik) आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यासह अनेकांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. केवळ आरोपांच्या फैरी झाडताझाडता आता या सर्वांमध्ये कायदेशीर लढाई देखील सुरू झाली आहे. आता एकमेकांना मानहानीचा दावा(Defamation Case), तसेच कायदेशीर नोटीस पाठवल्या आहेत.
कार्डिलिया क्रूझ प्रकरण पूर्णपणे बनावट असून, एनसीबीने शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अडकवण्यासाठी आणि खंडणी वसूल करण्यासाठी हे सर्व प्रकरण रचले असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र, एनसीबीच्या माध्यमातून भाजपचे नेते राज्यामध्ये ड्रग्सच्या व्यापाराशी जोडले आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध ड्रग्स माफियांशी असल्याचेही मलिक यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. भाजपच्या नेत्यांवर केलेल्या या आरोपांनंतर नवाब मलिक आणि विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यासोबतच मानहानीचा दावा आणि जाहीर माफी मागण्यासाठी नोटीसही पाठवण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये कोणी कोणावर मानहानीचा दावा केला आहे पाहूया या विशेष रिपोर्टमधून...
हेही वाचा -कंगना रणौतचा पद्मश्री तात्काळ परत घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करा, नवाब मलिकांचा हल्लाबोल
निलोफर खान यांचा फडणवीस यांच्याविरोधात मानहानीचा दावा -
11 नोव्हेंबरला नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान यांनी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पाच कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. पती समीर खान यांच्याकडे अमली पदार्थ मिळाले असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांवर केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे आपल्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली. तसेच या प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने आपल्या पतीला जामिन दिला असून चार्ज शीटमध्ये कोठेही अमली पदार्थाचा उल्लेख नाही. मात्र, कोणतीही शहानिशा न करता आपले पती समीर खान यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये समीर खान यांच्या घरी अमली पदार्थ पकडल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले असे म्हणत या वक्तव्याच्या विरोधात निलोफर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर 5 कोटीच्या मानहानीचा दावा केला आहे.
अमृता फडणवीस यांची मलिकांना नोटीस-
अमृता फडणवीस यांनी 'रिवर मार्च' या संस्थेसाठी गायलेल्या गाण्याला ड्रग्स पेडलर असलेल्या जयदीप राणा यांनी आर्थिक सहाय्य केले होते, असा आरोप नवाब मलिक यांनी लावला होता. आरोप करत असताना जयदीप राणा आणि अमृता फडणवीस यांचा फोटो नवाब मलिक यांनी ट्विट केला. तसेच राज्यात ड्रग्सचा व्यापार देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला. आता या ट्विटच्या विरोधात अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना नोटीस पाठवली आहे. नवाब मलिक यांनी केलेले ट्विट डिलीट करावे तसेच सार्वजनिक माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा केला असून, त्याला समोरे जावे लागेल, असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे.