मुंबई -मुंबईतील 9 लसीकरण केंद्रांवर 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण कोविन ऍपमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने दोन दिवस लसीकरण बंद ठेवल्यानंतर सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू झाले. मात्र कोविन ऍपमधील तांत्रिक अडचणी काही दूर होताना दिसत नाहीयेत, तर दुसरीकडे अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीची भीती वाटत असल्याचे समोर आले आहे. परिणामी लसीकरण कमी होत असून, याचा फटका बीकेसी कोविड सेंटरमधील लसीकरण मोहिमेला बसला आहे.
कोविन ऍपवर नोंदणी बंधनकारक
पहिल्या टप्प्यात 1 लाख 30 हजार कोरोना योद्ध्यांना अर्थात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी 9 केंद्र तयार करण्यात आले आहेत. मात्र कोरोना लसीचे काही दुष्परिणाम समोर आल्याने, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तसेच कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून कोविन ऍपवर नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.अशावेळी पहिल्याच दिवशी कोविन ऍपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी पुढील दोन दिवसासाठी मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली होती.