मुंबई -ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाला पूर्णविराम देत शैक्षणिक वर्ष संपल्याचे जाहीर करून 14 जून पर्यंत शाळांना सुट्टी देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त यांना निवेदन पाठवले आहेत.
शैक्षणिक वर्ष संपल्याचे जाहीर करा, भाजप शिक्षण आघाडीची मागणी
शैक्षणिक वर्ष संपल्याचे जाहीर करा, भाजपा शिक्षण आघाडीने मागणी केली आहे. या बाबत निवेदन शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे.
भाजपा शिक्षण आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्गामुळे मागील वर्षी एप्रिल पासून शिक्षकांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले होते. अनेक शिक्षकांना कोरोनाच्या कामासाठी शासनाने जुंपले होते. त्यामुळे मे महिन्याची सुट्टी शिक्षकांना मिळाली नव्हती. शिक्षकांनी एप्रिल महिन्यापासून सतत 13 महिने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवले. ऑनलाईन शिक्षणाचा कोणताही अनुभव नसतांना झूम, गुगल मिट तसेच इतर प्लॅटफॉर्मचा वापर करत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. जे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नव्हते त्यांच्या वाड्या, वरस्त्यांवर जाऊन ऑनलाईन शिक्षण दिले. विविध प्रशिक्षणे घेतली. सतत डेस्कटॉप, लॅपटॉप व मोबाईलवर काम केल्यामुळे अनेक शिक्षकांना दृष्टीदोषच्या आजाराने ग्रासले आहेत. सध्या शिक्षक निकालाचे कामे करत असून 1 मेपर्यंत बहुतेक शाळांचे काम पूर्ण होणार असल्याने 2 मे ते 14 जून पर्यंत ऑनलाईन शिक्षणाला पूर्णविराम देत शाळांना सुट्टी घोषित करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने केली आहेत.