मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना अनेकदा समन्स बजावून पण चौकशीला उपस्थित न राहिल्याने परमबीर सिंह यांना फरार घोषित (Declared absconding) करा असा अर्ज 13 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केला आहे. यावर आज मंगळवारी मुख्य दंडाधिकारी न्यायालय निर्णय देणार आहे.
परमबीर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईमध्ये पाच वेगवेगळे खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांचा तपास मुंबई गुन्हे शाखेचं पथक (Mumbai Crime Branch Squad) करत आहे. गुन्हे शाखेच्या तपासानुसार परमबीर सिंह हे फरार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला आहे. या व्यतिरिक्त रियाझ भाटी (Riyaj Bhati) आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.