मुंबई - राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाईल, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. यामुळे राज्यात या महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या हालचालींना पूर्णविराम लागला आहे.
केंद्र सरकारने नुकतेच राज्यातील शाळा या २१ सप्टेंबरपासून सुरू करता येतील का, याविषयी सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक संघटनेच्या प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक घेतली. त्यात त्यांनी राज्यातील संस्थाचालकांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत संस्थाचालकांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन २१ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यास नकार दिला. तसेच राज्य शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यासाठी ज्या काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या त्याचा नव्याने फेरविचार केला जावा, आणि शाळा सुरू करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतर घेतला जावा अशी मागणी राज्यातील विविध शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी केली हेाती. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीनंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली. शिक्षणमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे मागील महिन्यात शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयातही तातडीने बदल केला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या बैठकीत संस्थाचालकांनी पुन्हा एकदा पालकांकडून अनेक ठिकाणी भरले जात नसल्याच्या शुल्कांसाठी विभागाने शुल्क भरण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत शिक्षणमंत्र्यांकडे शुल्क भरण्यासाठीचे आदेश काढण्याची मागणी लावून धरली होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला शिक्षण सचिव वंदना कृष्णा, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.