मुंबई -मुंबईत गेल्या मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली होती. काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दादर मार्केट दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर मार्केटमधील व्यावसायिकांसाठी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करता येईल अशा पर्यायी ठिकाणी मार्केट सुरु केले जाणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि विशेष गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनिल कोल्हे यांची आज पालिका मुख्यालयात भेट झाली. या भेटीनंतर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, दादर मार्केट येथे सकाळच्या वेळी फुले आणि भाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे दादर मार्केटमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जावे म्हणून मार्केट वांद्रा बीकेसी आणि चुनाभट्टी येथील सोमय्या उद्यानात तात्पुरते स्थलांतरित केले जाणार आहे. कोरोनाचा प्रसार असताना दादर मार्केट असेच स्थलांतरित करण्यात आले होते. आता पुन्हा हे मार्केट स्थलांतरित केले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.